
परिचय
'अनुष्टुभ्/ नव-अनुष्टुभ्' हे वाङ्मयीन द्वैमासिक गेली ४८ वर्षे ‘अनुष्टुभ् प्रतिष्ठान' तर्फे प्रकाशित केले जात आहे.
शहरी व ग्रामीण स्तरावरून होणारी साहित्यनिर्मिती, नवजाणीव, आधुनिक संवेदनशीलता आणि वाङ्.मयीन प्रयोगशीलता यांना व्यासपीठ प्राप्त करून देणं हा या नियतकालिकाचा प्रयत्न राहिलेला आहे.
कला व साहित्य निर्मिती हा एक जीवनशोध आहे आणि त्याचा आस्वाद व अभ्यास हा सुद्धा एक जीवनशोधच आहे अशी ‘अनुष्टुभ्’ची जन्मापासूनची धारणा आहे.
या जीवनशोधाला अधिक व्यापक स्वरूप कवीवर्य पु. शि. रेगे, प्रा. नरहर कुरुंदकर, पद्मश्री डॉ. अशोक केळकर, श्री. प्रभाकर पाध्ये, कवीवर्य ना.धों. महानोर, प्रा. गंगाधर पाटील आणि प्रा. म. सु. पाटील यांसारख्या साहित्याग्रणींनी प्राप्त करून दिले आहे.
प्रथम प्रतिष्ठानची स्थापना व नंतर कार्याचा प्रारंभ असे न होता, प्रथम कार्याला प्रारंभ व नंतर कार्याला सामावून घेणारे व्यापक स्तरावरचे व्यापक प्रकल्प हाती घेऊ पाहणारे आणि वाङ्मयसेवा हाच अस्तित्वधर्म मानणारे प्रतिष्ठान स्थापन होणे असा घटनाक्रम ‘अनुष्टुभ्’ प्रतिष्ठानच्या संदर्भात घडलेला आहे.
‘अनुष्टुभ्’ हे नियतकालिक द्वैमासिकाच्या स्वरूपात १९७७ च्या जुलै महिन्यात प्रथम प्रकाशित झाले. ‘अनुष्टुभ्’च्या या पहिल्या अंकाचे संपादन प्रा. रमेश वरखेडे यांनी केले होते.

अभिप्राय
अभिनंदन आणि शुभेच्छा!
‘अनुष्टुभ्’ हे आजचे एक प्रमुख वाङमयीन नियतकालिक आहे. पर्यायाने सांस्कृतिकही, साहित्यावर असीम निष्ठा असलेल्या काही लेखक – कवी- समीक्षकांच्या सहकारातून जन्माला आलेल्या या नियतकालिकाने अल्पावधीत साहित्य क्षेत्रात अग्रस्थान संपादन केले. परंपरेचे स्मरण ठेवून प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देण्याच्या धोरणामुळे ‘अनुष्टुभ्’ मराठी साहित्याच्या प्रगतीला महत्त्वपूर्ण हातभार लावीत आहे. वाङ्मयाच्या प्रस्थापित प्रकाशन केंद्राबरोबर परिवर्तनाची दिशा दाखविली आहे. ‘अनुष्टुभ्’ला आणि त्याच्या पाठीशी असलेल्या सर्व संपादक, संचालकांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. --वि. वा. शिरवाडकर






